प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ आपण बाजारांतून, दुकानांतून, आणलेल्या मातीच्या, शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे, आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनविणे. मातीच्या गोळ्यालाच (पृथ्वीपासून) मातीपासून घडवल्यामुळे पार्थिव म्हणतात, म्हणूनच या व्रताचे नाव ‘पार्थिव गणपती पूजन,’ असे आहे. ज्यांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळू शकत नाहीत, त्यांनी शुचिर्भूत म्हणजेच स्वच्छ (शक्य झाले तर पितांबर, धोतर) कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे उपवस्त्र घेऊन ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर (श्रींची मूर्ती चौरंगावर स्वच्छ रुमाल/कापडावर नीट ठेवावी.) पूर्व अगर पश्चिमेला तोंड करून पाटावर/आसनावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा, कुंकवाचा, शेंदूर, अष्टगंधाचा टिळा लावावा. घरच्या देवांना (शक्यतो दोन पाने, सुपारी, पाच किंवा एक रुपयाचे नाणे, असा विडा व नारळ ठेवून) नमस्कार करावा. घरातील वडीलधारी व्यक्तींना (सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना) नमस्कार करावा. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूजेला बसावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेसारखे महत्त्वाचे काम सुरू करू नये. या संस्कारांचा चांगला परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो
.......................................................................................................................................
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.
गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत. खाली दिलेल्या youtube लिंक ला लिंक करून गणपती अभिषेक करू शकता https://youtu.be/BVsasr6VhWI